
मेळघाट ( Melaghat ): शोधस्वराज्यचा लेखक : मिलिंद बोकील
आदिवासींना जंगलाचा एखादा हिस्सा व्यवस्थापनासाठी द्यायचा, एवढ्यापुरती मेळघाटातील ही प्रक्रिया मर्यादित नाही. यामागे एक व्यापक तत्त्व आहे - ते म्हणजे स्वशासनाचे. ते अर्थातच आदिवासींपुरते मर्यादित नाही, पण सध्या आपण ते आदिवासींकडून शिकतो आहोत. स्वशासनामध्ये केवळ आपल्या गावाचा कारभार आपण चालवायचा एवढेच अभिप्रेत नाही; तर त्या पलीकडे जाऊन आपल्या भोवतालच्या सगळ्या सृष्टीची आपण काळजी घ्यायची, आपले गाव हे एक कुटुंब आहे असे समजून त्यातील प्रत्येक व्यक्तीची कदर करायची, आपल्या गावापलीकडेही एक मोठा समाज आहे हे लक्षात घेऊन त्याच्याशी नातेसंबंध जोडायचे आणि ह्या सर्वांमधून आपले जगणे अधिक अर्थपूर्ण करायचे- अशी कामना आहे. ह्यालाच स्वराज्य असे म्हणतात. स्वराज्य हे साधन आहे आणि साध्यही. हे प्रत्यक्षात कसे करता येईल, त्यामध्ये कोणत्या अडचणी येतील, त्या अडचणींचे निराकरण कसे करायचे ह्याचा शोध म्हणजे स्वराज्याचा शोध.