
लॉरी बेकर ( Laurie Baker ) : अतुल देऊळगावकर
प्रतिभावंत वास्तुशिल्पी लॉरी बेकर यांचे जीवन म्हणजे वास्तूकलेतील एकहाती अबोल क्रांती होती. निसर्गाशी तादात्म्य पावणाऱ्या हजारो अल्पखर्ची वास्तूंमधून 'वास्तुकला म्हणजे गोठवलेले संगीत' या उक्तीची प्रचीती येते. तसेच बेकर यांना अभिप्रेत तत्त्वज्ञान आणि जीवनशैली उमजून येते. 'पंचक्रोशीतील सामग्रीतून आपल्या गरजा भागवल्या पाहिजेत.' हा गांधीजींचा सल्ला त्यांनी प्रमाण मानला होता. हरित इमारत, पर्यावरणपूरक वास्तू, भूकंपरोधक घरे, सर्जनशील निवास, नगररचना वास्तुकलेतील कोणत्याही प्रांतात नव्याने काही घडत असेल तर त्यावर बेकर यांचा प्रभाव अटळ आहे. पौर्वात्य व पाश्चात्य विचार, नवता व परंपरा, बुद्धी व भावना, निसर्ग व माणूस, आशय व घाट यात अद्वैत साधून आधुनिकता व सुसंस्कृतता रुजवणारी बेकर यांची ही सर्जनशील यात्रा 59 वर्षे अथक होती.