
भक्ती-भीती-भास ( Bhakti-Bheeti-Bhas ) - श्रीमंत माने
भक्ती-भीती-भास
फॅसिझमच्या छायेतील भारताचे दर्शन
आजपर्यंत आपल्या देशापुढील विविध प्रश्नांचे विवेचन अनेकांनी अनेक प्रकारे केलेले आहे. परंतु त्या प्रश्नांचा विचार सामाजिक-राजकीय समालोचनाच्या पायावर क्वचितच झालेला दिसतो. म्हणूनच श्रीमंत माने यांनी लिहिलेले ‘भक्ती-भीती-भास : फॅसिझमच्या संकटाचा अन्वयार्थ’ या पुस्तकाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे.
वर्तमानातील समस्यांचे एका पत्रकाराच्या तीक्ष्ण नजरेने शोधलेले सूक्ष्म तपशील जे आपल्याला माहीत नसतात किंवा त्याकडे आपले कळतनकळत दुर्लक्ष होते, त्यांचे अभ्यासपूर्ण संकलन या पुस्तकात आहे. त्यांच्याच प्रकाशात श्री. माने यांनी नजिकच्या भूतकाळाचे करून घेतलेले आकलन यामुळे वाचकांना अंतर्मुख तर करतेच, परंतु त्यांच्या जाणिवांचा विकास करण्यातही मदत करते.
भारताचा आजचा कालखंड हा आपल्या संविधानकर्त्यांनी दूरदृष्टीने स्थापन केलेल्या लोकशाही प्रजासत्ताकाच्या संक्रमणाचा आहे. हे संक्रमण भविष्यात कोणती दिशा घेईल यासंबंधी ज्यांची लोकशाही मूल्यांवर निष्ठा आहे त्यांच्या दृष्टीने चिंता करायला लावणारा हा प्रश्न आहे. उद्या आपण बहुसंख्येच्या बळावर भारताला पुढारलेल्या सुसंस्कृत जगाने कालबाह्य ठरविलेल्या धर्माधिष्ठित राज्याकडे घेऊन जाणार आणि त्याच्याद्वारे एका नव्या खास भारतीय शैलीतल्या फॅसिझमला जन्म देणार, की पुन्हा आपला प्रवास प्रजासत्ताकाकडे नेणार, या गंभीर समस्येचे अनेक निर्देश या पुस्तकात आहेत.
- रावसाहेब कसबे.
प्रकाशक | मनोविकास प्रकाशन |
---|---|
ISBN |
978-81-943491-1-2 |
पुस्तकाची पाने | 284 |
बाईंडिंग |
पेपरबॅक |