इंडियन अॅनिमल फार्म ( Indian Animal Farm ) - प्रवीण बांदेकर
राजकीय भूमिका असणं, सर्व प्रकारच्या शोषणाचा अंत करेल अशा तत्वज्ञानाशी
बांधिलकी असणं, मुक्तिदायी मूल्यांसाठी किंचितही तडजोड ना करणारी माणसं ...
त्यांचे विचार, कृती हे सारं आदर्शवत नि कालबाह्य झालेलं आहे... अशा माणसांना आज व्यावहारिक, भांडवली जगात स्थान नाही... हा विचार-प्रचार जाणीवपूर्वक पसरवल्या
जाणाऱ्या काळात प्रवीण दशरथ बांदेकरांनी आत्यंतिक तळमळीने लिहिलेली ही कादंबरी एक महत्वाची राजकीय कृती आहे. निष्ठा, मुक्तिदायी मूल्यांप्रती आस्था, अटळ राजकीय संघर्षातील स्थित्यंतरं, शोषणाबद्दलचं व्यापक आकलन - भान आणि म्हणूनच लढत्या माणसांना संपवलं जाण्याची कृती, त्या कृतींबद्दल संताप, प्रश्न, उद्द्विग्नता हे सारं सहजपणे इंडियन ऍनिमल फार्म मध्ये आकारास येत. ही कादंबरी आज आपण सर्वच ज्या अराजकातून जातो आहोत, त्या अवकाशाचा दस्तऐवज आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्य, विचारवंतांच्या केल्या जाणाऱ्या हत्या, जाती- धर्माची द्वेषमूलक पुटं, विचारसरणी - तत्वज्ञान - राजकीय पक्षांमधले आंतर्विरोध हे सारंच लेखक ठामपणे मुक्तिदायी तत्त्वज्ञानाच्या बाजूला उभं राहून मांडतो. मानवमुक्तीच्या तत्वज्ञानाची वारंवार चिकित्सा उजळणी करावी लागते, आंतर्विरोध तपासावे लागतात ... ते करतांना हटवादी भूमिका बाजूला सारून शिकण्याच्या भूमिकेत असावं लागत.. ही जगातल्या अनेक सत्ता-संघर्षातून आपल्याला दिसलेली मोठी निकड आहे. हे बांदेकर जाणवून देतात. त्यांच्या कादंबरीतील पात्रं ही अनेक अर्थांनी सांस्कृतिक वर्चस्ववादाला धक्का देणारी रुपकं आहेत. ती धर्मचिकित्सा करू पाहणारी आहेत. आशयाची मिथकांचा खुबीनं आणि नेमका केलेला वापर हाही कादंबरीचा एक विशेष.
ज्या ज्या माणसाचा, माणसाच्या शोषणाला विरोध आहे त्या प्रत्येकाला आपलीशी वाटेल; तर शोषणमूलक संस्कृती - धर्मवाहकांना थेट आव्हान देणारी अशी ही कादंबरी आहे.
-प्रियांका तुपे.
प्रकाशक | शब्द पब्लिकेशन |
---|---|
ISBN |
9789382364894 |
पुस्तकाची पाने |
256
|
बाईंडिंग |
पेपरबॅक |